एसटी कर्मचारी आंदोलनामुळे राज्यासह देशभरात चर्चेत आलेले अत्यंत वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आता नवी इनिंग सुरु करणार आहेत. कोर्टाच्या आवारात दिसणारे गुणरत्न सदावर्ते आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. लवकरच ते आपल्या नव्या संघटनेची घोषणा करुन एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चे पॅनल उभा करणार असल्याचे समजते. स्वत: सदावर्ते यांनीच तसे संकेत दिले आहेत.
राज्य सरकारवर घणाघाती आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, यापुढे आता कष्टकीर माणसाचे नेतृत्व शेतातील बुजगावण्यांच्या हाती नसेल. कष्टकरी समाज आता स्वत:चीच माणसे निवडतील. आजवर या बुजगावण्यांनी कष्टकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम केले. आता ही परिस्थीती तशीच राहणार नाही. परिस्थिती नक्की बदलणार आहे. लवकरच आपण एका संघटनेची स्थापना करत निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले. (हेही वाचा, Gunratna Sadavarte यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; जामीनासाठी अर्ज ते एसटी कर्मचार्यांकडून पैसे घेतल्याची कबुली पहा काय काय घडलं?)
मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते हे कोर्टात गेले होते. त्यामुळे त्याही वेळी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु झाले. कर्मचाऱ्यांनी संपक केला. या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. इतकेच नव्हे तर या आंदोलनाचे नेतृत्वही अनपेक्षीतरित्या सदावर्ते यांच्याकडे आले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडली. परंतू, त्यासाठी त्यांनी मोठी आर्थिक रक्कम वसूल केल्याचाही आरोप झाला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानी काही कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचे सूत्रधार सदावर्ते असल्याचा आरोप झाला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रदीर्घ काळात पोलीस कोठडीत आणि न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर पुढे सदावर्ते यांना जामीन झाला. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.