अन्न आणि औषध प्रशासन (FDA) अन्न आणि सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा कठोरपणे पाठपुरावा करत असून, मुंबईतील 13 झोनमधील मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी आणि त्यानंतरच्या प्रयोगशाळेच्या विश्लेषणासाठी नमुने गोळा करण्यासाठी 13 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. याबाबत एफडीएचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव म्हणाले की, ‘दिवाळी सण जवळ आला असताना आम्ही निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्न पदार्थ, विशेषत: मिठाई, खाद्यतेल, नमकीन, मावा आणि खवा यांच्या विरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे.’
जर कोणी भेसळयुक्त, अशुद्ध किंवा निकृष्ट दर्जाच्या खाद्य वस्तूंची विक्री करताना पकडले गेले तर त्याला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या तरतुदींनुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
भेसळ, बनावट रंग, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि बनावट कच्चा माल यांच्या विरोधात मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे आढाव म्हणाले. संकलित केलेले नमुने असुरक्षित, आरोग्यास हानिकारक आणि त्यामध्ये निकृष्ट साहित्य आढळल्यास तीन महिन्यांपर्यंत कारावास आणि दंड आकारला जाईल. यामध्ये 2-5 लाख रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो.
टीमचा भाग असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, FSSAI ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना असूनही, सणासुदीच्या काळात उत्पादक किंवा मिठाईच्या दुकानांकडून भेसळयुक्त आणि निकृष्ट साहित्याचा वापर वाढतो. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सैल/पॅक न केलेली मिठाई विकणाऱ्या दुकानदारांना उत्पादनापासून ते एक्सपायरी तारखांपर्यंतचे सर्व तपशील ट्रेवर नमूद करणे गरजेचे आहेत, जेणेकरून ग्राहकांना ते खरेदी केल्यानंतर ते किती काळ वापरता येईल हे कळेल. (हेही वाचा: मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी BMC च्या हालचाली सुरू; काही भागात मिस्ट मशीन्सचा फवारा)
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्हाला कळले होते की अनेक दुकानदार किंवा उत्पादक FSSAI नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि भेसळयुक्त मिठाई विकत आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. आम्हाला एफडीए आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याचे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.’ सणासुदीच्या काळात मिठाई आणि नमकीन वस्तूंसाठी दर्जेदार साहित्य वापरावे, असे आवाहनही एफडीएने उत्पादक आणि व्यापाऱ्यांना केले आहे.