Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर 22 लोकल फेऱ्या आज (शनिवार, 10 ऑक्टोबर) पासून वाढवण्यात आल्या आहेत. सध्या कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर मध्य आणि हार्बर मार्गावर जलद लोकल चालवल्या जात आहेत. जलद लोकल ठराविक स्थानकांत थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे धीम्या लोकलच्या 22 फेऱ्या आजपासून वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापैकी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल्स (Mumbai Chhatrapati Shivaji Terminus) ते कसारा (Kasara), कर्जत (Karjat) मार्गावर 18 लोकल्स धावतील. तर सीएसएमटी (CSTM) ते पनवेल (Panvel) मार्गावर 4 फेऱ्या असतील.

लोकलच्या या नव्या 22 फेऱ्यांमुळे मध्य मार्गावर एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 453 होणार आहे. यापूर्वी 431 लोकल फेऱ्या मध्य मार्गावर धावत होत्या. दरम्यान, आधीच्या लोकलच्या वेळा आणि स्थानकं यात कोणताही बदल होणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर नवीन फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कसारा मार्गावर थानशेत आणि उंबरमाळी स्थानकात थांबणार नाहीत. तर कर्जत मार्गावर शेलू स्थानकात थांबा दिलेला नाही. हार्बर मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकल्संना रे रोड, कॉटन ग्रीन, चुनाभट्टी, मानसरोवर स्थानकांत थांबा देण्यात आलेला नाही.

पहा ट्विट:

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे लोकल केवळ अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहेत. या कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. (पश्चिम रेल्वे मार्गावर विरार- चर्चगेट- विरार मार्गावर 2 महिला विशेष रेल्वे फेर्‍या सुरू; इथे पहा वेळापत्रक)

कोविड-19 संकट अद्याप संपलेले नाही. परंतु, विशेष खबरदारी घेत अनलॉकींगला सुरुवात झाली आहे. सध्या देशासह राज्यात अनलॉक 5 सुरु आहे. या अंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार्स, फुडकोर्ड्स, सिनेमागृह, स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे अनलॉकच्या या टप्प्यातही लोकल सेवा सामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकल सेवा कधी सुरु होणार या प्रतिक्षेत नागरिक आहेत.