Bhima Koregaon Case: आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांचे NIA समोर आत्मसमर्पण; सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश
आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा (संग्रहित संपादित प्रतिमा)

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील नागरी हक्क कार्यकर्ते आणि विचारवंत आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) शरण येण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांचे वकील मिहिर देसाई यांनी सांगितले की, तेलतुंबडे आत्मसमर्पण करण्यासाठी दक्षिण मुंबईतील कंबाला हिलमधील एनआयएच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्याच वेळी दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांनी 2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणाबाबत (Bhima Koregaon Violence) एनआयएकडे आत्मसमर्पण केले आहे. ते यासाठी दिल्लीच्या एनआयए कार्यालयात पोहचले आहेत.

यावर्षी 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे आणि सह-आरोपी, नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळत, त्यांना चौकशी एजन्सीसमोर शरण येण्याचे निर्देश दिले होते. तेलतुंबडे आणि इतर अनेक नागरी हक्क कार्यकर्त्यांविरूद्ध माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाल्यानंतर या कार्यकर्त्यांना सुरुवातीला पुणे पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या बैठकीत चिथावणीखोर भाषणे व वक्तव्य केले होते, त्यानंतर दुसर्‍याच दिवशी हिंसाचार भडकला. बंदी घातलेल्या माओवादी गटांचे ते सक्रिय सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले होते. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडे आणि सह-आरोपी गौतम नवलखा यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. हायकोर्टाने त्यांच्या याचिका फेटाळल्यानंतर या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (हेही वाचा: Bhima Koregaon Case: आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना आत्मसमर्पणासाठी 1 आठवड्याचा अवधी; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश)

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी : Watch Video

त्यानंतर 8 एप्रिल रोजी, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना एका आठवड्यात तुरूंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच कोर्टाने स्पष्ट केले होते की, यापुढे शरणागती पत्करण्याची मुदत वाढविण्यात येणार नाही. त्यानुसार आज हे दोघांनीही एनआयए समोर आत्मसमर्पण केले आहे.