मुंबईतील कांजूरमार्ग (Kanjurmarg) परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीवर पूर्ववैमनस्यातून अॅसिड हल्ला (Acid Attack) करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडली. यासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पीडित मुलीचा मार्च 2018 मध्ये शाळेतील शिक्षकांशी व काही कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता. याबाबत पीडिता पोलिसांत तक्रार करणार होती. ती पोलिसांत जाऊ नये म्हणून धमकाविण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रार दाखल करताना केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि इतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - नाशिक: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; बदनामीची धमकी देत मोबाइलमध्ये केले चित्रिकरण)
या अॅसिड हल्ल्यात पीडिता जखमी झाली. हल्ला झाला त्यावेळी काही रहिवाशांनी तिला जवळील राजावाडी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अॅसिड हल्लाग्रस्त पीडिता ही विक्रोळी पार्कसाइट परिसरात राहते. ती माहीम येथील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.