अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयात माहिती नाही- संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रम 30 डिसेंबर रोजी पार पडला यामध्ये एकूण 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. पण या कार्यक्रमाला अवघे पाच दिवस न पूर्ण होताच आज शिवसेनेचे मोठे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक माध्यमांमध्ये सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे मात्र यामागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "एखाद्या मंत्र्याला जर का राजीनामा द्यायचा झाल्यास तो मुख्यमंत्री किंवा राजभवनावर पोहचवणे अपेक्षित असते, सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बाबत अशी कोणतीही माहिती नाही" असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेला मोठा धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

संजय राऊत यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार, "कॅबिनेट मंत्रिमंडळात अद्याप तरी कोणतेही मतभेद नाहीत, सत्तार यांच्या निर्णयाच्या बाबत काहीही कल्पना नव्हती, उलट त्यांना पक्षात नेहमी सन्मानाने वागवले जात होते" असे राऊत यांनी म्हंटले आहे.

ANI ट्विट

याशिवाय राऊत यांनी सत्तार यांच्या या राजीनाम्यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे,"ते (सत्तार) पक्षात नवीन आहेत, तरीही आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते,कोणताच विभाग हा लहान किंवा मोठा नसतो, याची त्यांना जाणीव असेल आणि त्यामुळे ते महाशिवबंधन सोडून कुठेही जाणार नाहीत" असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, हीच उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या उतरत्या कळेची सुरुवात आहे असे म्हंटले आहे.