Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

महाराष्ट्र सरकारने राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा मोफत पूर्ण करणारा हा उपक्रम आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये आपला दवाखाने सुरु झाले आहेत. आता मुंबईला आणखी 250 आपला दवाखाने मिळणार आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी बीएमसी प्रशासक इक्बाल सिंग चहल आणि नागरी संस्थेच्या चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ठिकाणे, कौशल्य विकास केंद्रे,  पाळणाघरे, रुग्ण मदत केंद्रे, स्मशानभूमी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, उद्याने, कचरा विल्हेवाट, मलबार हिल जलाशयाची वाढती क्षमता या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

15 जानेवारीपासून मुंबईत पंचवीस नवीन रुग्ण मदत केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. स्मशानभूमींच्या नूतनीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत आणि जानेवारी 2024 मध्ये ते काम सुरू होईल, अशी माहिती लोढा यांना देण्यात आली. दिवाळीनंतर सोसायट्यांना सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्या वितरित केल्या जातील.

मलबार हिल जलाशयाच्या विस्ताराबाबतही या बैठकीत चर्चा झाली असून हे काम थांबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी, आयआयटी मुंबईचे संचालक, बीएमसी अधिकारी आणि मलबार हिल येथील रहिवाशांनी सुचवलेल्या तीन आयआयटी प्राध्यापकांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती महिनाभरात निर्णय घेईल. (हेही वाचा: Mumbai Air Pollution: मुंबई ठरले जगातील 7 व्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर; जाणून घ्या दिल्ली, कोलकाता शहरांची स्थिती)

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये एकूण 700 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेद्वारे आरोग्य केंद्रासाठी औषधे, चाचण्या, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, 500 चौरस फूट जागा, फर्निचर, स्वच्छता व सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट एवढा कर्मचारी वर्ग, 30 प्रकारच्या चाचण्या, 105 प्रकारच्या औषधी, 66 प्रकारची वैद्यकीय उपकरणे, फर्निचर व वैद्यकीय साहित्य सामग्री, सॉप्टवेअर, हार्डवेअर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.