Aapla Dawakhana: आता संपूर्ण राज्यात सुरु होणार 'आपला दवाखाना’ उपक्रम; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटनप्रसंगी सर्वसामान्यांना या यंत्रणेचा कशाप्रकारे लाभ होणार याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. अशाचप्रकारे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविणा-या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेचा त्यांनी पुनरुच्चार करीत जास्तीत जास्त लोकांना दैनंदिन आजारांसाठी प्रभावीपणे या दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्ण सेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे. माजी खासदार मेघे यांनी अगदी विपरीत परिस्थितीत आरोग्य सेवेची सुरुवात केली. त्यांचे रुग्ण सेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या भूमीत रुग्ण सेवेचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या रुग्ण सेवेचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी पुढे सुरू ठेवला आहे. (हेही वाचा: आदित्य ठाकरेंनी साधला CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा; म्हणाले- 'हा जनतेच्या पैशाचा अपव्यय’, जाणून घ्या सविस्तर)

या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत. संस्थेचे रुग्ण सेवेबरोबरच शिक्षण कार्यही सुरू आहे. कोरोना काळातही संस्थेने कौतुकास्पद काम केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे आभार आमदार मेघे यांनी मानले. तत्पूर्वी त्यांनी रुग्णालय व परिसराची पाहणी केली तसेच रुग्णांची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली.