Aurangabad: औरंगाबाद येथील एसटी डेपोत राडा; कर्मचाऱ्यांकडून एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
Representative Image (फाईल फोटो)

औरंगाबाद (Aurangabad) येथील परिवहनच्या सोयगाव आगारात (Soegaon Depot) एसटी कर्मचाऱ्यांनी एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे आगार परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते, जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील, रवींद्र तायडे, सागर गायकवाड आदी करत आहेत.

राणीदास चव्हाण (वय, 37) असे सुरक्षा रक्षकांचे नाव आहे. प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे, राजू बारी, राजेंद्र भोपे असे आरोपींचे नाव आहेत. राणीदास चव्हाण हे कर्तव्यावर असताना वरीलपैकी कोणालाही आगारात प्रवेश देऊ नको, असा आदेश स्थानक प्रमुखांनी दिला होता. त्यानुसार राणीदास यांनी प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे, राजू बारी, राजेंद्र भोपे यांना प्रवेशद्वारावर रोखले. त्यावेळी राणीदास या पाच जणांत वाद झाला. याच वादातून या पाचही जणांनी राणीदास चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, रघुनाथ बारी यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याने राणीदास गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जळगावला रवाना करण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुंबई: सानपाडा नजीक सायन-पनवेल महामार्गावर लक्झरी बस आगीत जळून खाक (Watch Video)

या घटनेमुळे आगार परिसरात एकच खळबळ माजली होती. दरम्यान, राणीदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.