Fire At Mumbai Airport: मुंबई विमानतळावर दुर्घटना थोडक्यात टळली, Air India कंपनीच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनास आग (WATCH VIDEO)
Fire At Mumbai Airpor | (Photo Credit- Twitter)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानळावर (Mumbai International Airport ) आज एक मोठा अपघात घडला मात्र या अपघाताचे मोठ्या दुर्घटनेत रुपांतर होता होता टळले. एअर इंडियाच्या (Air India) विमानाला पुशबॅक देताना एका वाहनाला अचानक आग (Fire At Mumbai Airport) लागली. ही आग इतकी मोठी होती की या आगीचे केव्हाही मोठ्या दुर्घटनेत रुपांतर होऊ शकत होते. मात्र, विमानतळ प्रशासन आणि अग्निशमन दलाची सक्रीय असलेली यंत्रणा यांमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महत्त्वाचे असे की, या घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवीत हानीचे वृत्त नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे AIC-647 हे विमान मुंबईहून जामनगरला निघत होते. विमान हवेत झेपावणार होते. विमानात प्रवासीही स्थानापन्न झाले होते. या प्रवाशांची संख्या 85 इतकी होती. दरम्यान, या विमानाला पुशबॅक देण्यासाठी ट्रॅक्र आला होता. अचानक काय घडले हे कोणालाही कळण्यापूर्वी या ट्रॅक्टरला आग लागली. ही आग निदर्शनास येताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांनी पुढील काही मिनीटांतच ही आग नियंत्रणात आणली. ज्यामुळे पुढील संभाव्य धोका आणि अनर्थ टळला. (हेही वाचा, एअर इंडियाचा प्रवाशांना मोठा दिलासा, प्रवासाची तारीख बदलल्यास पैसे द्यावे नाही लागणार)

ट्विट व्हिडिओ

एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तसेच, कोणीही जखमी झाले नाही. ट्रली ओढणाऱ्या ट्रॅक्टरचे काही प्रमाणात नुकसान झाले. ट्रॅक्टरला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत चौकशी आणि तपास सुरु आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.