मुंबई: डोंगरी भागात 12.5 कोटींचा मेफेड्रॉन ड्रग्जसाठा जप्त, एकाला अटक
Drugs Raid At Dongri Area (Photo Credits: Twitter)

मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्याची धडक मोहिम मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सुरु केली आहे. यात आतापर्यंत अनेकांना अटक झाली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आज मुंबईच्या डोंगरी भागात 25 किलोचा मेफेड्रॉन ड्रग्जसाठा (Mephedron Drugs) जप्त करण्यात आला असून याची किंमत जवळपास 12.5 कोटी इतकी आहे. यात एकाला अटक देखील करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे.

मुंबईत मागील काही महिन्यांपासून ड्रग्जसाठा जप्त केला जातोय. यात आतापर्यंत अनेक ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली आहे. 12 फेब्रुवारीला मुंबईच्या कुरार (Kurar Area) भागात मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून मुंबई गुन्हे शाखेच्या हाती 3.2 किलो ड्रग्जसाठा लागलाय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ड्रग्ज साठ्यासह ड्रग्ज रॅकेटचा मोठा सूत्रधार हाती लागला आहे.हेदेखील वाचा- मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून अनेक ठिकाणी NCB चे छापे; आतापर्यंत 100 ग्रॅम मेफेड्रोन, 1.034 किलो सायकोट्रॉपिक औषधे जप्त

मुंबई गुन्हे शाखेने एका ड्रग्ज पेडलरला अटक केली असून त्याच्याकडून 1 कोटी 2 लाखांचा ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. तसेच हा अटक केलेला आरोपी ड्रग्ज रॅकेटचा मोठा नेता असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.

महिन्याभरापूर्वी मुंबईच्या मिरारोड परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात ड्रग्जचा पुरवठा करणारा चांद मोहम्मद याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून 400 ग्रॅम MD जप्त करण्यात आला असून याची किंमत 8 ते 10 लाखांपर्यंत आहे. तसेच यात हॉटेलमध्ये एका टॉलिवूड अभिनेत्रीलाही ताब्यात घेण्यात आले होते.