Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मुंबईत लवकरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक उभारले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती.

"अण्णा भाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही त्यांच्या साहित्यातून त्यांनी जनजागृती करून चळवळीला नवसंजीवनी देऊन एक चैतन्य निर्माण केले. शाळेत न गेलेल्या माणसाचे जन्मशताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करत आहे. ही खूप प्रेरणादायी बाब आहे. आज या दोन्ही महापुरुषांच्या नावे मुंबई विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र चालू केले जात आहेत, ही चांगली बाब आहे. या दोन्ही महापुरुषांचा समर्थ वारसा घेऊन पुढचा इतिहास आपण निर्माण केला पाहिजे", असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- आणीबाणी 1975-77 काळात तुरुंगवास भोगलेल्यांचे पेन्शन बंद; कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटात महाराष्ट्र सरकारचा निर्णय

ट्वीट-

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते.