धक्कादायक! पुत्रप्राप्तीचे कारण सांगून पिंपरीतील भोंदूबाबाने एकाच घरातील 5 बहिणींवर केला लैंगिक अत्याचार
Representational Image | (Photo Credits: PTI)

पिंपरीत एका कुटूंबियांवरील केलेली करणी काढण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने त्या घरातील 5 बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपण पुत्रप्राप्ती आणि घरात असलेलं गुप्तधन काढून देऊ असे कारण सांगून या भोंदूबाबाने हा घृणास्पद प्रकार केला आहे. सोमनाथ कैलास चव्हाण असे या भोंदूबाबाचे नाव असून तो 32 वर्षांचा आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सोमनाथ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोमनाथ याने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे, असेही त्याने सांगितले होते.

पीडित महिलेच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळून पीडित महिलेसह तिच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सर्व बहिणींना बाहेर जाताना झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ‘तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

हेदेखील वाचा- धक्कादायक! मोबाईल गेमचे आमिष दाखवत एका तरूणाकडून 6 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचा हा विकृत प्रकार पाहता त्याने याआधीही असे प्रकार केले असतील अशी पोलिसांनी शक्यता आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्या तरी गोष्टीचे आमिष दाखवून किंवा काही गोष्टींची भीती दाखवून महिलांवर लैगिक अत्याचार केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे येथे एका तरुणीला अ‍ॅसिडटाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. आरोपीने लैंगिक अत्याचार करत पीडित तरुणीचा व्हिडिओ सुद्धा शूट केल्याची बाब उघडकीस आली आहे.