Representational Image | (Photo Credits: PTI)

Solapur: सोलापुर जिल्ह्यातील सांगोल्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात खुंटीशी खेळत असताना एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. खुंटीशी खेळत असताना अंगावरील स्वेटरची दोरी खुंटीत अडकल्याने गळफास लागून या चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोहम जगन्नाथ शेंडे असं या चिमुकल्याचं नाव आहे. सोहम 9 वर्षाचा होता. सोहमच्या मृत्यूमुळे शेंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या शिवाय या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, थंडीचे दिवस असल्याने सोहमने स्वेटर घातला होता. तो घरातील पलंगाच्या वरील बाजूस असलेल्या खुंटीजवळ खेळत होता. यावेळी सोहमने घातलेल्या स्वेटरची दोरी खुंटीमध्ये अडकली आणि त्याला गळफास लागला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोहमचे मित्र त्याला बाहेर खेळण्यासाठी बोलावण्यास आले तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. (वाचा -पालघर: लिव्ह इन पार्टनरकडून प्रेयसीची हत्या, भिंतीत मृतदेह पुरला)

आतापर्यंत अनेक चिमुकल्यांना खेळताना आपला जीव गमवावा लागला आहे. थोड्याशा चुकीमुळे किंवा घरच्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक मुलांना खेळ जिवाशी बेतल्याच्या विविध घटना तुम्ही ऐकल्या असतील. पब्जी गेमच्या वेडाने अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडे योग्य लक्ष देणं गरजेचं आहे.

मागच्या महिन्यात रायगड जिल्ह्यात क्रिकेट खेळत असताना झालेल्या वादातून एका मुलाचा मृत्यू झाला होता. डोक्यात बॅट घातल्याने या मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. प्रेम मंगेश दळवी असं या मुलाचं नाव होतं.