चौदा वर्षांपूर्वी पवईतील हिरानंदानी रुग्णालयात (Dr. L.H. Hiranadani Hospital) उपचारासाठी आलेल्या एका 73 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. वैद्यकीय उपचारांत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा ठपका लावत राज्य ग्राहक न्यायालयाने हिरानंदानी रुग्णालयाला 8 लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच ह्या वृद्ध महिलेचा उपचार करणा-या 2 डॉक्टरांनी 2008 पासून वर्षाला 9 % दराने व्याजासह एक लाख रुपये वृद्धेच्या मुलींना द्यावे, असेही आदेश न्यायाधीश ए.पी. भंगाळे व डॉ. एस. के. काकडे यांच्या खंडपीठाने दिलेत. तसेच ह्या खटल्यासाठी लागलेल्या खर्चाचे रुग्णालय आणि डॉक्टरांनी मृत महिलेच्या मुलींना प्रत्येकी 25 हजार रुपये द्यावेत, असेही खंडपीठाने नमूद केले आहे.
ऑगस्ट २००५मध्ये या वृद्धेला मूत्रमार्गातील जंतूसंसर्गाच्या कारणामुळे हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर तिला सोडून देण्यात आले आणि दर आठवड्याने किंवा पंधरवड्याने मूत्रचाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर रक्ताची उलटली झाल्याने तिला १८ नोव्हेंबरला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मधुमेह व स्तनांचा कर्करोग हे आजार लक्षात घेऊन नेफ्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट यांचे सल्ले घेण्यात आले आणि नंतर २४ नोव्हेंबरला तिला अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले. मात्र, विविध अवयव निकामी झाल्याने २७ नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला.
आजाराचे योग्य निदान न केल्यामुळे आणि उपचारामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोन्ही मुलींनी मुंबई उपनगर जिल्हा अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे २००८मध्ये तक्रार अर्ज दाखल केला आणि १९ लाख रुपयांच्या भरपाईसह कारवाईच्या आदेशाची विनंती केली. त्याला उत्तर देऊन रुग्णालय प्रशासनाने या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. या मंचाने सुनावणीअंती अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर या मुलींनी अॅड. गीता खनुजा यांच्यामार्फत राज्य आयोगाकडे अपिल केले होते.
आजाराचे योग्य निदान करण्यात रुग्णालय प्रशासनाने विलंब केल्यामुळे व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ह्या वृद्ध महिलेचा नाहक बळी गेल्याचे तपासात आढळून आले. संपूर्ण तपासाअंती रुग्णालयात विरोधात गुन्हा नोंदवून खंडपीठाने दंड ठोठावणारा निर्णय दिला.