Representational Image (Photo Credits: PTI)

पुणे महानगरपालिकेचे (PMC) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात येत असल्याची घोषणा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासंदर्भात आज नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत श्री. शिंदे यांनी पुणे महापालिकेचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने, कार्यपद्धती विहित करण्याबाबत नगरविकास विभागाने 2 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या महासभेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा ठराव 10 मार्च 2021 रोजी केला होता. सदरचा ठराव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्याची दखल घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या बैठकीचे आयोजन केले होते.

श्रमिकांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत पाठपुरावा करत होते. सातवा वेतन आयोग लागू झाल्याबद्दल श्री. शिंदे यांनी पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. (हेही वाचा: Mumbai Sero Survey: दिलासादायक! शहरातील 70 ते 80 टक्के लोकांमध्ये Covid-19 विरुद्ध प्रतिकारशक्ती असण्याची शक्यता)

पीएमसीमध्ये काम करणाऱ्या एकूण 17,000 कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाचा थेट लाभ मिळेल. पीएमसीच्या आकडेवारीनुसार, पुणे महानगरपालिका 91 वर्ग I, 448 वर्ग II, 4262 वर्ग III आणि 13,000 पेक्षा अधिक वर्ग IV कर्मचारी काम करतात. दुसरीकडे, केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्के करू शकते. AICPI चे आकडे समोर आले आहेत. त्यानंतर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याची चर्चा आहे. जून 2021 साठी महागाई भत्ता अद्याप जाहीर केलेला नाही.