Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसवर (Coronavirus) उपाययोजना म्हणून सुरु केलेल्या लॉक डाऊनची (Lockdown) तिसरी फेज सुरु झाली आहे. भारतात अनेक ठिकाणी ग्रीन झोनमध्ये वाढ झाली आहे, मात्र महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील स्थिती अजूनही चिंताजनक आहे. त्यात मुंबई (Mumbai) शहरात तर कोरोना विषाणूचा हाहाकार माजला आहे. मुंबईत बुधवारी कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दहा हजाराचा टप्पा पार करून, 10,527 झाली. आज मुंबईमध्ये 769 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, देशाच्या आर्थिक राजधानीत कोविड-19 मुळे आजच्या 25 लोकांच्या मृत्यूसह एकूण मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या वाढून 412 झाली. आज बीएमसीने याबाबत माहिती दिली.

एएनआय ट्विट -

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज नवीन 1233 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याची एकूण रुग्ण संख्या 16 हजार 758 इतकी झाली आहे. आजपर्यंत 3094 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आज 34 तर आतापर्यंत 651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील झोपडपट्ट्या आणि चाळीमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. धारावीत आज 68 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत व  एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 733 वर पोहोचली आहे. (हेही वाचा: मुंबईच्या 'झोपडपट्टय़ां'मध्ये Coronavirus चा सर्वाधिक उद्रेक; चाळी, झोपडपट्ट्यांसारख्या गर्दीच्या परिसरात 80 टक्के Containment Zones व 60 % मृत्यूंची नोंद)

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 6 मे 2020 पर्यंत मुंबईमध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकांच्या तपासण्या झाल्या आहेत. आतापर्यंत 21 टक्के लोक बरे होऊन घरी गेले आहेत व सध्या शहरातील मृत्यूदर 3.9 टक्के आहे. 32 लाखापेक्षा जास्त घरांचे सर्वेक्षण झाले असून, 2 लाखापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट ट्रेस आणि 9.3 हजार आजारी व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. सध्या ज्याप्रकारे लॉक डाऊनचे पालन होत आहे ते पाहून, प्रशासनाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. मात्र लोकांनी अजून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमधील चिन्हांकित केलेल्या 1,927 कंटेन्मेंट झोनपैकी, 80% परिसर हे झोपडपट्टी किंवा चाळी यांसारखी गर्दीची ठिकाणे आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बीएमसीच्या (BMC) सर्वेक्षणात असे आढळले आहे की, शहरातील मृत्यूंपैकी 60% मृत्यू हे झोपडपट्ट्यांमध्ये आणि तत्सम भागात घडले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.