Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 714 पोलिसांना कोरोनाची लागण- Maharashtra Police
Maharashtra Police | (File Photo)

देशभरात कोरोना विरुद्ध एक महायुद्ध सुरु असून हे युद्ध जिंकण्यासाठी कोविड योद्धा (COVID Warriors) रात्रंदिवस झटत आहेत. यात सर्वाधिक कोरोना बाधित संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाशी लढा देणा-या आणि नागरिकांसाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यातील 648 पोलिसांवर सध्या उपचार सुरु असून 61 जण बरे झाले आहेत. तर 5 पोलिसांचा दुर्दैव मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणा-या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

इतकच नव्हे तर लॉकडाऊन मुळे पोलिस तैनात असलेल्या भागात परिस्थिती आवरण्यासाठी गेलेल्या 194 पोलिसांना मारहाण झाल्याचे देखील महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले आहे. यासंदर्भात 689 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई: कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला; हल्लेखोरास अटक

कोरोनामुळे राज्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी हे कोरोना योद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. ब-याच ठिकाणी पोलिस आपला पोलिसी खाक्या बाजूला ठेवत गांधीगिरी पद्धतीने लोकांना सोशल डिस्टंसिंगचे महत्व पटवत आहेत. तसेच गोरगरिबांना अन्न-पाणी देऊन माणुसकीचे एक उदाहरण ही लोकांसमोर ठेवत आहे.

सद्य स्थितीत महाराष्ट्रात सद्य स्थितीत 19063 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 3470 लोक बरे झाले आहेत.