Electric Scooter Battery Explosion in Mumbai: घरामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit: Twitter)

Electric Scooter Battery Explosion in Mumbai: घरामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) च्या बॅटरीचा स्फोट (Battery Explosion) झाल्याने वसईतील एका 7 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर शब्बीर अन्सारी (वय,7 वर्ष) 80 टक्के पेक्षा जास्त भाजला होता. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 23 सप्टेंबर रोजी वसईतील रामदास नगर येथील सर्फराज अन्सारी यांच्या घरी बॅटरीचा स्फोट झाला.

प्राप्त माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी शब्बीर आजीसोबत हॉलमध्ये झोपला होता. दुपारी अडीचच्या सुमारास सर्फराजने हॉलमध्ये बॅटरी चार्ज करण्यासाठी ठेवली आणि तो बेडरूममध्ये झोपायला गेला. शब्बीरची आईही बेडरूममध्ये झोपली होती. पहाटे 5.30 च्या सुमारास स्फोट आणि शॉर्ट सर्किटच्या आवाजाने सर्वजण जागे झाले. या स्फोटात शब्बीरची आजी किरकोळ जखमी झाली. तर शब्बीर गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, 30 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क)

बॅटरीचा स्फोट इतका जोरदार होता की, यावेळी घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि घराचे मोठे नुकसान झाले. घरातील उपकरणांचेही नुकसान झाले आहे. इलेक्ट्रीक स्कूटर घराबाहेर उभी होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा आढावा घेतला.

माणिकपूर पोलिसांनी सांगितले की, बॅटरी अति उष्ण झाल्यामुळे स्फोट होऊ शकतो. जयपूरस्थित स्कूटर निर्मात्यांना बॅटरीची चाचणी करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सर्फराजने मात्र बॅटरी जास्त गरम न झाल्याचे सांगितले आहे.