Coronavirus: भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह परिवारातील 6 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण
सुजितसिंह ठाकूर (Photo Credit : Facebook)

सध्या देशात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापासून ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यंत अनेक नेत्यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. आज भारतीय जनता पार्टीचे आमदार सुजितसिंह ठाकूर (Sujitsingh Thakur) यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी सोशल मिडियाद्वारे दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून उपचार चालू असल्याची माहितीही मिळत आहे.

आपल्या पोस्टमध्ये सुजितसिंह ठाकूर म्हणतात, ‘मी 3 ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केली. परिवारातील 6 सदस्य कोरोना बाधित आले. काल परत सदस्य व संपर्कातील सर्वांचे RT PCR केले. माझ्यासह परिवारातील आणखी 3 तर संपर्कातील 3 बाधित तर 3 अहवाल प्रतिक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची पकृती चांगली आहे. लक्षणे नाहीत. काळजी घेतो आहे. आपणही आपली व परिवाराची काळजी घ्यावी.’

पहा ट्वीट -

ते पुढे म्हणतात, ‘काळजीपोटी अनेकांचे कॉल येतात. पण सर्व कॉल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. आम्ही सर्व बरे होऊत. लवकरच बरा होऊन सेवा हाच संकल्प घेऊन सक्रीय असेन.’

दरम्यान, याआधी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यासह नुकतेच आमदार रवी राणा, त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या सह कुटुंबातील 12 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली होती.