सध्या देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाबाबत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरील राज्य आहे. जिथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे, तिथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आता महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज 431 नवीन कोरोना विषाणू प्रकरणांची नोंद झाली आहे आणि 18 मृत्यू नोंदवले गेले आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 5649 झाली असून, मृत्यूंची संख्या 269 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 789 रूग्ण या कोरोना विषाणू आजाराने बरे झाले आहेत.
एएनआय ट्विट -
431 new #COVID19 cases & 18 deaths have been reported today in Maharashtra, taking number of cases to 5649 & deaths to 269 in the State. Out of the new deaths, 10 reported in Mumbai. 789 patients have recovered from the disease in the State so far: Maharashtra Health Department pic.twitter.com/XkYuQKi3cs
— ANI (@ANI) April 22, 2020
पुण्यात आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. दुसरीकडे मुंबईच्या धारावी येथे 9 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीमध्ये एकूण रुग्णांची संख्या 189 तर एकूण मृत्यूची संख्या आता 12 झाली आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळले आहेत व बरे होऊन घरी गेलेल्यांमध्येही सर्वाधिक म्हणजे 374 एवढी रुग्णसंख्या मुंबईची आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडले आहे. सध्या रुग्ण बरे व्हायचे प्रमाण पहिले तर दिवसाला 26 रुग्ण बरे होत आहेत.
दुसरीकडे लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी रेशनकार्डधारकांना मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमध्ये, प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचे वाटप 24 एप्रिलपासून सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत करण्यात येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री अश्वजीत कदम यांनी याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: COVID19: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; मुंबई, पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत आणखी भर)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 27 एप्रिल रोजी सकाळी सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे.