नांदेड (Nanded) जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नांदेडमधील बिलोली (Biloli) तालुक्यातील 4 शिक्षकांनी इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या आरोपी शिक्षकांची नावे आहेत.
या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात या चार शिक्षकांविरोधात पॉक्सो कायदा तसेच कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांनी केलेल्या या लाजिरवाण्या कृत्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपींचे हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केले होते. तसेच दिल्लीतील 2012 मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाचा निकाल तब्बल 8 वर्षांनी लागला असून दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. परंतु, असे असतानाही देशात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडत आहेत. नांदेड येथे घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी आहे. यावरून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (हेही वाचा - Nirbhaya Gang-Rape & Murder Case: चार गुन्हेगारांना फाशी देत जल्लाद पवन आपल्या आजोबांचा विक्रम मोडणार; दोषी विनय शर्मा, मुकेश सिंह यांची 'क्यूरेटिव पिटीशन' न्यायालयाने फेटाळली)
नांदेड जिल्ह्यातील मुख्यालयापासून 50 किमीच्या अंतरावर असणाऱ्या साईबाबा विद्यालयात शिकणाऱ्या पीडितेला शिक्षकांनी अश्लिल व्हिडिओ दाखवला. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडितेच्या पालकांशी संपर्क साधला. या प्रकरणात शिक्षकांची साथ देणाऱ्या महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे यांच्यावर तसेच 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप हे चारही शिक्षक फरार असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे.