Students

बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. भौतिकशास्त्राच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने राज्य शिक्षण मंडळास कळविण्यात आले असून यामुळे एचएससी बोर्डासह शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.एबीपी माझाने या संदर्भातली बातमी ही दिली आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून  बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर असल्याचे समोर आले होते. सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने याची माहिती शिक्षणमंडळाला देण्यात आली होती. दरम्यान शिक्षण मंडळाने या सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीसा पाठवत, चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच केंद्रप्रमुख यांना देखील बोलावून त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. मात्र दोन हस्ताक्षर कोणाचे हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.

दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यावर 15 मे पासून परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेण्यात आली. हा प्रकार कुठे झाला. उत्तरपत्रिका जमा कधी केल्या, त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या, असे प्रश्न केंद्र संचालकांना विचारण्यात आले. त्यानंतर पर्यवेक्षक, कस्टडियनचीदेखील सुनावणी घेण्यात आली. आता मॉडरेटरची सुनावणी घेतल्यानंतर हा प्रकार कसा व कुठे घडला, या निष्कर्षापर्यंत पोहोचता येण्याची शक्यता आहे. या उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी बाहेर दिल्या होत्या की सेंटरमध्येच हे करण्यात आले हे अजून समोर आले नाही. याची चौकशी होऊन लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.