देशातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, संक्रमितांची संख्या 9 हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या बाबतीत सर्वाधिक बाधित राज्य, महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 352 नवीन रुग्ण आढळले असून, 11 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 242 प्रकरणे केवळ मुंबईतील (Mumbai) आणि 39 प्रकरणे पुण्यातून (Pune) समोर आली आहेत. यासह, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 2334 वर पोहोचली आहे.
352 new #Coronavirus positive cases and 11 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases in the state rises to 2334: Maharashtra Health Department pic.twitter.com/nAq1IhLWg4
— ANI (@ANI) April 13, 2020
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 9352 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 905 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, व 980 रुग्णांनी या आजारावर विजय मिळवला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना पाहून महाराष्ट्रामध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे.
आज महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी सर्वात जास्त कोरोना बाधित आढळून आहे त्यामध्ये, मुंबई– 242, मालेगाव- 14, औरंगाबाद- 4, बुलढाणा-4, पुणे- 39, पिपंरी चिंचवड- 6, नागपूर- 11, ठाणे- 9, वसई विरार- 5, ठाणे-9 यांचा समावेश होतो. सर्वात जास्त संख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रनंतर दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान व मध्य प्रदेश यांचा नंबर लागतो. कोरोना व्हायरसमुळे देशात 21 दिवस लॉकडाउन आहे. मात्र उद्या ते वाढण्याचीही शक्यता आहे. अनेक राज्यांनी कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.