Kalyan COVID-19 Cluster: गणेशोत्सवात एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जणांना कोरोना विषाणूची लागण
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Kalyan COVID-19 Cluster: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सव काळात अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत गेल्याचं चित्र स्पष्ट दिसून आलं आहे. कल्याणमध्ये जोशीबागमधील एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. हे कुटुंब गणेशोत्सवात एकत्र आल्याने त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) आरोग्य अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की, जोशीबागेतील 4 मजली इमारतीत एका व्यावसायिकाचे 40 जणांचे कुटुंब एकत्र राहते. या कुटुंबीयांनी इमारतीमध्ये दीड दिवसांचा गणपती बसवला होता. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी इमारतीतील सर्व कुटुंबिय एकत्र जमले होते. या सर्वांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी एकत्र स्वयंपाक बनवला होता. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केलं होतं. यातील एकाला कोरोनाची लक्षण दिसून आली होती. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. (हेही वाचा - Coronavirus Recovery Rate In India: भारताने एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक नोंदवला; 70,000 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ड)

कुटुंबातील या सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 30 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या या कुटुंबातील कोरोना संक्रमित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील सर्वजणांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं आहे.