Iqbal Singh Chahal (Photo Credit: ANI)

मुंबईतील (Mumbai Rains) विविध भागात रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये गेल्या 10 तासाच्या आत 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच ही पूरसदृश परिस्थिती असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी म्हटले आहे.

मुंबईत गेल्या 10 तासाच्या आत 230 मिमी पाऊस पडला. ही पूरसदृश परिस्थिती आहे. सकाळी जोरदार पाऊस पडल्याने मिठी नदी धोक्यात आली होती. आत्तापर्यंत धोक्याच्या पातळीपेक्षा खाली वाहत आहे. सध्या लोकांचे स्थलांतरही थांबविण्यात आले आहे, असे इक्बाल सिंह चहल म्हणाले आहेत. दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरूच राहणार आहेत. हे देखील वाचा- मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर; मदत व पुनर्वसन विभागाची माहिती

एएनआयचे ट्विट-

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट असून पुढचे 48 तास असाच मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.