Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातून (Dharashiv District) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. उमरगा तालुक्यातील केसर गावाजवळील गांधी विद्यालयातील 19 विद्यार्थी रक्त वाढीसाठी पुरविलेल्या आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या (Iron-Folic Acid Tablets) खाल्ल्याने आजारी पडले. सोमवारी सकाळी गोळ्या घेतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली. शासकीय रुग्णालय उपकेंद्रातर्फे विद्यार्थ्यांना रक्त वाढीसाठी महात्मा गांधी विद्यालयात गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
शाळा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सर्व बाधित विद्यार्थ्यांना मोरम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्धाळे स्वामी यांनी दिली. चार विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. इतर 15 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. याशिवाय, आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. (हेही वाचा -Food Poisoning in Pune School: अन्नातून विषबाधा झाल्याने 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील शाळेतील घटना)
दिल्लीत फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खाल्ल्याने 21 विद्यार्थी रुग्णालयात दाखल -
काही वर्षांपूर्वी दिल्ली सरकार संचालित शाळांमध्ये शिकत असलेल्या एकवीस विद्यार्थ्यांना नव्याने सुरू झालेल्या सरकारी कार्यक्रमांतर्गत लोह आणि फॉलिक ऍसिड पूरक आहार घेतल्याने सौम्य लक्षणांसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात नेल्यानंतर दोन तासांनी विद्यार्थ्यांना लक्षणे जाणवली. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा -Food Poisoning in Hyderabad: ग्रील्ड चिकन आणि बिर्याणी खाल्ल्याने 3 मित्रांना विषबाधा; रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल)
लोह आणि फॉलिक ऍसिड गोळ्या -
केंद्र सरकारच्या आरोग्य उपक्रमाअंतर्गत शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी शाळा-आधारित लोह आणि फॉलिक ऍसिड (IFA) पूरक आहाराची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देण्यात येतात. ॲनिमियापासून संरक्षण करण्यासाठी सरकार हा उपक्रम राबवते.