कोरोना व्हायरस (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. भारतामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) व मुंबई (Mumbai) येथील धोका दिवसेंदिवस वाढत असलेला दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये आज 1606 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली, यासह राज्यातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आजच्या 67 रुग्णांसह 1135 झाली आहे. आज राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज 884 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यासह एकूण रुग्णांची संख्या 18396 वर गेली आहे.

यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, आज मुंबईमध्ये 238 रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे शहरात आतापर्यंत 4806 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे शहरातील मृतांचा आकडा 696 वर पोहोचला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली. मुंबईच्या धारावी या परिसरात कोरोनाचे शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. आज धारावीत 53 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1198 पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात दादर, माहिम आणि धारावीत एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (हेही वाचा: राज्यात काल एका दिवसात 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री; नागपूर व लातूर येथील ग्राहकांनी मागवली सर्वात जास्त दारू)

महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर पुणे हे सर्वात बाधित शहर आहे. पुण्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आज दुपारी 3 वाजेपर्यंत 3720 इतकी झाली आहे. यामध्ये 191 जणांचा मृत्यू झाला असून, 1880 रुग्ण बरे झाले आहेत. पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4271 झाली आहे. आजपर्यत पुणे विभागामध्ये एकुण 45, 593 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 40, 911 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4680 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 36, 583 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4,271 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.