मुंबईतील 16 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, पश्चिम रेल्वेवरील कांदिवली, मीरा रोड आणि गुरु तेग बहादूर नगर या तीन महत्त्वाच्या स्थानकांचाही समावेश
Mira road Railway Station (Photo Credits: Wiki Commons)

अपु-या सुविधा, तडे गेलेले प्लेटफॉर्म, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेल्या मुंबईतील 16 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून त्यात कांदिवली (Kandivali), मीरा रोड (Mira Road)  आणि गुरु तेग बहादूर नगर (जीटीबी) (Guru Teg Bahadur Nagar) या स्थानकांचा समावेश आहे. या 16 रेल्वे स्थानकांवर सर्व आधुनिक सुविधांसह उत्तम दर्जाचे खाण्याचे स्टॉल्स, ओपन एअर रेस्टॉरन्ट आणि इतर सोईसुविधा देण्यात येणार आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांचा (Mumbai Railway Stations) कायापालट व्हावा यासाठी रेल्वे विकास महामंडळाने आखलेल्या योजनेनुसार, पश्चिम रेल्वेच्या कांदिवली आणि मीरा रोड, तर हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर नगर स्थानकाच्या विकासाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या तीन स्थानकांच्या विकासाचे काम पुढील 5 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महामंडळाने ठेवलेले आहे.

मीरा रोड रेल्वे स्थानकांत ओपन एअर उद्यानाची संकल्पना असलेले रेस्टॉरंट उभारण्यात येणार आहे. कांदिवली स्थानकात विमानतळाच्या धर्तीवर ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसाठी पिकअप आणि ड्रॉप पॉइंट विकसित करण्यात येणार आहेत. केवळ एकच ओव्हरब्रिज असलेले गुरू तेगबहादूर नगर स्थानक दुमजली होणार आहे. या स्थानकात एकूण 4 ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहेत. या पुलांची रुंदी 10 मीटर इतकी असणार आहे.

हेही वाचा- मुंबई, ठाण्यातील १९ स्थानकांचा होणार पुनर्विकास, MRVC देणार अत्यावश्यक सुविधांवर भर

कांदिवली रेल्वे स्थानकाची इमारत तीन मजली असणार आहे. तसेच येथे फूड कोर्ट, बुक शॉप आणि मेडिकल स्टोएर सुरु होणार आहे. तर दुसरीकडे मीरा रोड मधील 1 नंबर वर वरती डेक तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुरु तेग बहादूर नगर स्थानकातही फलाट क्रमांक 1 च्या वर डेक उभारण्यात येणार आहे. तसेच ओपन एअर गार्डन वर आधारित रेस्टॉरंट ही सुरु करण्यात येणार आहे.