Nagpur Lockdown | (Photo Credits: ANI)

नागपूरमध्ये (Nagpur) कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असताना देखील नागपूरकर प्रशासनाने घालून दिलेले पायदळी तुडवत असल्याचे चित्र समोर येत आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, मास्क न लावणे यांसारखे प्रकार दिसत आहे. या गोष्टींची दखल घेत येथील प्रशासनाने नागपूरकरांना चांगलाच दणका दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शहरातील 14 उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दुपारी 1 नंतर विनाकारण रस्त्यांवर फिरणा-या लोकांवरील कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे नागपूरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र उड्डाणपूलावर पोलिस नसल्याकारणाने उड्डाणपूलावर सुसाट वाहने चालविण्याचा प्रकार काही उनाड युवक करत असल्याचे दिसत आहे. या सर्वांवर कडक भूमिका घेत शहरातील 17 पुलांपैकी 14 उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.हेदेखील वाचा- Nagpur Lockdown: नागपूरच्या कॉटन मार्केट मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; 15 मार्चपासून कडक लॉकडाऊन

त्याचबरोबर आता दुपारी 1 नंतर रस्त्यांवर विनाकारण फिरणा-यांना पोलिसांचा दंडुक्यांचा चोप मिळणार आहे. कोरोनाचे नियम जनतेने गांभीर्याने घ्यावे तसेच ते पाळावेत यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा क्वारंटीन सेंटर सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना होम क्वारंटीन सेंटरची सोय नाही त्यांनी या क्वारंटीन सेंटर मध्ये सोय केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा, खाजगी कार्यालयं बंद राहणार आहेत. तर सरकारी कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहणार आहे. दूध-भाज्या यांची दुकानं सुरू ठेवली जाणार आहेत. पण नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.