Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र राज्याभोवती कोरोना व्हायरसचा वेढा दिवसागणिक अधिक मजबूत होऊ लागला आहे. दररोज कोरोना रुग्णांमध्ये पडणारी मोठी भर, मृतांचा आकडा यामुळे राज्यभर चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे पोलिस यंत्रणांवरील ताण वाढत असून पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही वाढत आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल 1206 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील 24 तासांत 66 कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची त्यात भर पडली आहे. 1026 पैकी 283 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून 912 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 11 पोलिसांना कोविड 19 मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिस दलातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांना Arsenicum Album 30 आणि Camphora 1m या औषधांचे डोस देण्यात येत आहेत.

लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे केंद्राकडे लष्कराची मागणी करा अशा सूचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठकीत दिल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्राला लष्कराची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

ANI Tweet:

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 30706 वर पोहचला आहे. तर 22498 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर 7088 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे 1135 रुग्णांचा बळी गेला आहे. कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे वाढवण्यात आलेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. मात्र लॉकडाऊन 4.0 चे स्वरुप लवकरच जनतेसमोर स्पष्ट केले जाईल.