प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

Attendance Mandatory For Teachers: अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या (Final Year Exams) पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात ठाकरे सरकारने आदेश जारी केला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी सुरू झाली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यापुढे 100 टक्के उपस्थिती लावणं बंधनकारक असणार असल्याचं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. (हेही वाचा -Maharashtra CET 2020 Revised Exam Schedule: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे नवे वेळापत्रक जारी; mahcet.org वर पहा तारखा)

राज्यातील शिक्षकांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबरोबरचं उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन करणे आदी कामं असणार आहे. पुढील महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परंतु, अद्याप शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा काळात शिक्षकांनी कसा प्रवास करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना परीक्षा केंद्रांवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.