COVID-19: मुंबई मधील एका रुग्णालयातील 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

मुंबईत (Mumbai) कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून या रुग्णांची सेवा करणा-या रुग्णालयातील कर्मचा-यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. यात मुंबईतील एका रुग्णालयातील 10 नव्या कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णालयात आतापर्यंत 35 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कर्मचारी याच रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती ANI ने दिली आहे. या रुग्णालयात 3 नवे कोरोना बाधित रुग्ण अॅडमिट झाल्यानंतर यात 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना बाधितांची संख्या पाहता यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स आणि अन्य कर्मचारीही आपला जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे यांच्यावर उपचारादरम्यान यांच्यापैकी अनेकांना कोरोना ची लागण होत आहे. Covid-19: पुणे येथील ससून रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका 34 वर्षीय परिचारिकेला कोरोना विषाणूचा संसर्ग

कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करत असताना अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. यातच पुणे (Pune) येथील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) कार्यरत असलेल्या एका 34 वर्षीय परिचारिकेला (Nurse) कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात कोरोना विषाणूमुळे एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून, 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर भारतात नवे 1076 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची संख्या 11,439 वर जाऊन पोहोचली आहे. यात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.