लालपरी स्थलांतरीतांच्या मदतीला! 11 हजार 379 बसेस मधून 1 लाख 41 हजार 798 मजूर मूळ गावी रवाना
Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली एस.टी बस (ST Bus) राज्यातील स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत 11 हजार 379 बसेस मधून 1 लाख 41 हजार 798 स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय करण्यात आली आहे. या बसेसच्या माध्यमातून अनेक स्थलांतरीत मजूरांना मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, बसेस व्यतिरिक्त स्थलांतरीत मजुरांसाठी काही विशेष रेल्वे गाड्याही सोडण्यात आल्या होत्या. या रेल्वे गाड्यांचाही मजूरांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून ज्याप्रमाणे इतर राज्यातील स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्यात येत आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रातून आतापर्यंत 191 रेल्वे गाड्यांनी 2 लाख 45 हजार परप्रांतीय कामगारांना मूळ राज्यात पोहोचवलं - अनिल देशमुख)

महाराष्ट्रातून आतापर्यंत 191 रेल्वे गाड्यांनी 2,45,000 परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आलं आहे. या मजुरांच्या तिकिटासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.

स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी परतण्यासाठी दररोज 25 रेल्वे गाड्या धावत आहेत. बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्रपदेश, ओरिसा, जम्मू या राज्यातील मजूर श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून घरी परतू लागले आहेत. विशेष रेल्वे गाड्या सोडल्याने मजूरांना दिलासा मिळाला आहे.