Mulshi Bandh

पुण्याजवळील पौड (Paud) गावातील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची (Goddess Annapurna Idol) विटंबना केल्याच्या प्रत्युत्तरात सोमवारी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात स्थानिकांनी ‘बंद’चे आवाहन केले आहे. या घोषणेचा एक ग्राफिक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यात लिहिले आहे की, ‘पौड गावातील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या विटंबनाचा आम्ही निषेध करतो. या घटनेला प्रतिसाद म्हणून, मुळशीतील संपूर्ण हिंदू समाज सोमवारी (5 मे) बंद पाळेल.’ शनिवारी पौडमधील रहिवाशांनी या घटनेचा निषेध करत निषेध मोर्चा काढला. मोर्चादरम्यान ‘जय श्री राम’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पौड पोलिसांनी ग्रामदेवतेच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर पिता-पुत्र दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख चांद शेख (19) आणि नौशाद शेख (45) अशी आहे. माहितीनुसार, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये किशोरवयीन व्यक्ती अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करताना दिसत आहे. या प्रकरणाबाबत, पौड येथील रहिवासी शिवाजी वाघवले यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, आरोपी चांद नौशाद शेख हा नागेश्वर मंदिरात आला आणि त्याने देवाची मूर्ती तोडली आणि तिची विटंबना केली.

त्यानंतर स्थानिक लोक त्याच्या वडिलांशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेले. मात्र, मुलाच्या वडिलांनी धमकी देणारी भाषा वापरली आणि त्यांना शिवीगाळ केली. यानंतर, जमावाने वडील-मुलाला मारहाण केली आणि त्यांना पौड पोलीस ठाण्यात आणले. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही संतप्त तरुणांनी स्थानिक मशिदीवर दगडफेकही केली. पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी म्हणाले, या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Bhiwandi Suicide Case: ठाणे येथील भिवंडी परिसरात महिला तीन मुलींसह मृतावस्थेत आढळली)

या घटनेनंतर या ठिकाणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी पुणे मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस पथक तसेच हवेली विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मुळशी तालुक्यातील मुख्य चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणाबाबत, पौड पोलिस ठाण्यात कलम 196, 296(a), 298, 299, 302, 351(2), 352, आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.