Maharashtra Day 2019: अखेर गुजरात ला 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्रात आली; जाणून घ्या महाराष्ट्र राज्य निर्मितीचा प्रवास
Mumbai/Maharashtra (Representational Image: PTI)

1 मे रोजी राज्यात मोठ्या अभिमानाने ‘महाराष्ट्र दिन’ (Maharashtra Day) साजरा केला जाईल. 1 मे 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवसाची आठवण म्हणून ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा प्रवास हा तितकासा सोपा नव्हता, त्यात मुंबई मिळवण्यासाठीच्या लढ्यात तब्बल 106 लोक शहीद झाले होते. या हुतात्म्यांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते. स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचना होत असताना, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. मात्र स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी डावलण्यात आली. त्यात गुजरात आणि महाराष्ट्र यांचा काही भाग जोडून स्वतंत्र राज्य निर्मितीचा विचार सुरु झाला. महत्वाचे म्हणजे यामध्ये विर्दर्भाला स्थान देण्यात आले नव्हते.

मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे हे कारण देऊन मुंबई महाराष्ट्रात समविष्ट करण्यास नकार दिला. दरम्यान नेहरूनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणखी उफाळून आली, आणि मुंबईला महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यात 21 नोव्हेंबर इ. स. 1955 रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे 15 जणांना प्राण गमवावा लागला.

मात्र जेव्हा मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले तेव्हा मराठी जनता रस्त्यावर उतरली. या गोष्टीचा निषेध म्हणून 21 नोव्हेंबर इ.स.1956 साली मुंबईच्या फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात विशाल मोर्चा जमा झाला. या मोर्चावर लाठीहल्ला करण्यात आला, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी चक्क गोळीबार करण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे मुंबई प्राप्तीसाठी एकूण 106 लोकांना प्राणाचा त्याग करावा लागला. शेवटी या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे, इ.स. 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. (हेही वाचा: Maharashtra Day 2019: महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठमोळी गीते (Video))

मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचे 'व्याज' म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी अनेक व्यक्तींच्या प्रयत्नामुळेच, त्यागामुळेचपंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी मुहूर्तमेढ रोवली गेली.