भारताला मधुमेहाची (Diabetics) राजधानी म्हटले जाते. जगातील सुमारे एक चतुर्थांश मधुमेही येथे राहतात. यापैकी बहुतेक लोक असे आहेत ज्यांच्या मधुमेहावर कधीही उपचार केले गेले नाहीत. 'द लॅन्सेट' (Lancet) या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या अहवालानुसार, 2022 मध्ये जगातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 828 दशलक्ष लोकांना मधुमेहाचा त्रास झाला होता. यापैकी एक चतुर्थांश पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 212 दशलक्ष लोक भारतमध्ये, चीनमध्ये 148 दशलक्ष, अमेरिका 42 दशलक्ष, पाकिस्तान 36 दशलक्ष, इंडोनेशिया 25 दशलक्ष आणि ब्राझील 22 दशलक्ष आहेत.
एनसीडी रिस्क फॅक्टर कोलॅबोरेशनने केलेल्या या अभ्यासाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पाठबळ दिले. या अभ्यासात 200 देशांचा समावेश करण्यात आला होता. इम्पीरियल कॉलेज लंडनचे ज्येष्ठ लेखक प्रोफेसर माजिद इज्जती यांनी सांगितले की, या अभ्यासातून जगभरातील मधुमेहातील असमानता समोर आली आहे.
अनेक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उपचाराचा वेग खूपच कमी आहे किंवा तो एकाच ठिकाणी थांबला आहे, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या देशांमध्ये उपचाराअभावी अनेक रुग्णांच्या जीवनात गंभीर समस्या वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग खराब होणे, हृदयविकार, किडनी खराब होणे किंवा डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत. काही प्रकरणांमध्ये, अकाली मृत्यूचा धोका देखील असतो.
या अभ्यासात असे सांगण्यात आले की, जगात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 1990 ते 2022 या 32 वर्षांत पुरुष मधुमेहींची संख्या 6.8% वरून 14.3% पर्यंत वाढली. महिलांच्या बाबतीत, ही संख्या 6.9% वरून 13.9% झाली आहे. याचाच अर्थ जगात मधुमेहाचा धोका दुपटीने वाढत आहे. सर्वात मोठा धोका कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दिसून आला आहे. जपान, कॅनडा, फ्रान्स, स्पेन आणि डेन्मार्क यांसारख्या काही उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, गेल्या तीन दशकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अपरिवर्तित राहिले आहे किंवा किंचित कमी झाले आहे. (हेही वाचा: Toxic Levels of Lead Found in Turmeric: भारतातील हळदीमध्ये शिशाची पातळी मर्यादेपेक्षा 200 पट अधिक; उद्भवू शकतात आरोग्याच्या गंभीर समस्या)
या अभ्यासात असे सांगण्यात आले की, भारतातील स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये मधुमेहाचा धोका तितक्याच वेगाने वाढत आहे. महिलांमधील हा दर 1990 मध्ये 11.9% होता, तो 2022 मध्ये वाढून 24% झाला आहे. त्याच वेळी, पुरुषांची आकडेवारी 11.3% वरून 21.4% पर्यंत वाढली. उपचार न केलेला मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. बरेच लोक पर्यायी उपचारांचा पर्याय निवडतात, काही स्वत:च औषधोपचार करतात आणि बरेच लोक जोपर्यंत स्थिती बिघडत नाही तोपर्यंत जीवनशैलीत बदल करत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मधुमेहाबाबत सावध, काळजी आणि जागरूक राहण्याची गरज आहे.