KEM Hospital (Photo Credits-Facebook)

मुंबईमधील (Mumbai) प्रमुख नागरी रुग्णालयांपैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) लवकरच विशेष नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर क्लिनिकचे (Non-Alcoholic Fatty Liver Clinic) उद्घाटन होणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. हे क्लिनिक येत्या 28 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. या रुग्नालायाद्वारे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा झालेल्या रुग्णांना फायदा होईल.

बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताशी संबंधित आजार वाढत आहेत. बाह्यरुग्ण विभागाला (OPD) भेट देणाऱ्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी किमान 20 रुग्णांना यकृताचे विविध विकार असल्याचे निदान होते. या परिस्थितींमुळे यकृताचा दाह, सिरोसिस आणि अगदी फायब्रोसिस होऊ शकतो. केईएम रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून हे क्लिनिक सुरू करण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत म्हणाल्या, आमच्या शताब्दी उत्सवाचा एक भाग म्हणून आम्ही ही ओपीडी-आधारित सुविधा सुरू करत आहोत. फॅटी लिव्हरमुळे अनेक अवयवांची गुंतागुंत होऊ शकते. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आकाश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली हे विशेष क्लिनिक सुरुवातीला फक्त केईएम हॉस्पिटलमध्येच चालेल. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ अरुण वैद्य म्हणाले, सोनोग्राफी आणि फायब्रोस्कॅनद्वारे यकृतातील अतिरिक्त चरबीचे निदान केले जाते. 30-40 मिनिटे चालणारे नियमित व्यायाम ही स्थिती टाळू शकतात. (हेही वाचा: Hair Loss Causes: केस गळती संपेना, टक्कल पडणे थांबेना; ICMR म्हणे 'असला प्रकार कधीच पाहिला नाही')

यासह उच्चरक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. उपचारांमध्ये एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. मात्र हे उपाय पुरेसे नसतील आणि येत्या काही वर्षांत फॅटी लिव्हर महामारी उद्भवू शकते, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दर शुक्रवारी दुपारी 1.30 ते 3 या वेळेत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांकडून नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर विशेष ओपीडी केली जाईल. या ठिकाणी जलद बरे होण्यासाठी डॉक्टर विशेष समुपदेशनही करतील.