अंड्याचे (Eggs) सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी वाढते? त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो का? किंवा एका व्यक्तीने दिवसात किती अंडी खावीत? या सर्व गोष्टींबद्दल आयएएनएसने तज्ञांशी चर्चा केली. यावेळी अंडी शरीरासाठी पोषक असल्याचे तज्ञांनी सांगितले. रोज एक अंडे खाणे तुमच्या हृदयासाठी चांगले असते आणि त्यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही, असे तज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते ही अंड्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती निराधार आहे.
वाढलेले कोलेस्टेरॉल आणि खराब हृदयाच्या आरोग्यामुळे एखादी व्यक्ती दररोज किती अंडी खाऊ शकते यावर दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. या वादाबाबत तज्ज्ञांनी भाष्य केले. केरळ राज्य आयएमए रिसर्च सेलचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी आयएएनएसला सांगितले की, अंडी हा संपूर्ण पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. अंडी हे कदाचित जगातील प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत, त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजांसह इतर पोषक घटक देखील असतात. महत्त्वाचे म्हणजे हे सहज उपलब्ध आणि तुलनेने परवडणारे आहेत.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट जयदेवन म्हणतात, अंडी खाण्याबद्दल खूप अनावश्यक भीती आहे, लोक ते खाण्यास घाबरतात. मात्र हे अवास्तव आणि निराधार आहे. विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दररोज अंड्यांची संख्या वाढल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढत नाही. त्यांनी स्पष्ट केले की, रक्तातील कोलेस्टेरॉल मुख्यतः यकृतामध्ये शरीराच्या विविध पौष्टिक आणि चयापचय गरजांच्या प्रतिसादात तयार होते. रक्तातील कोलेस्टेरॉलचा थेट आहारातील कोलेस्टेरॉलशी संबंध आहे ही एक मिथक आहे.
मात्र उच्च कोलेस्टेरॉलची, विशेषतः उच्च एलडीएल पातळी (खराब कोलेस्ट्रॉल) टाळणे देखील गरजेचे आहे. मात्र अंड्यांचा त्यांच्याशी संबंध नाही, तज्ज्ञांच्या मते, कोलेस्टेरॉल वाढण्याच्या घटकांमध्ये सिगारेट ओढणे, दारूचे सेवन, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, बैठे जीवन, व्यायामाचा अभाव, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. त्यामुळे दररोज एकापेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी परिणाम बदलण्याची शक्यता नसते. (हेही वाचा: Antibiotic Resistance: सतत अँटिबायोटिक्स घेणाऱ्यांनो सावध व्हा! येत्या 25 वर्षात होऊ शकतो जवळपास 4 कोटी लोकांचा मृत्यू- Reports)
दरम्यान, अंडी उच्च दर्जाची प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस आणि सेलेनियमने समृद्ध असतात. त्यामध्ये मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे कोलीन देखील असते. अंड्यांमधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. जीवनसत्त्व ड चा मुख्य स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.