पुण्यात 7000 किलोची मिसळ बनवण्याचा विक्रम; 30 हजार गरजूंमध्ये होणार पुणेरी मिसळचे वाटप
Misal Pav | (Photo Credits: Facebook)

मराठमोळा झणझणीत आणि चटपटीत पदार्थ म्हणजे मिसळ. नाव काढताच तोंडाला पाणी सुटणारा आणि अगदी अमराठी लोकांच्याही आवडीचा. दरम्यान, मिसळप्रेमींसाठी अशीच एक सुखद बातमी समोर येत आहे. पुण्यातील (Pune) सुर्यदत्ता फूड बँकेच्या (Suryadatta Food bank) वतीने तब्बल सात हजार किलो महामिसळ बनवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज रविवार, 14 मार्च रोजी पहाटे चार वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

'सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ 2021' कार्यक्रम फेसबुक, युट्युबवरुन पाहता येणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकाराने आणि सुर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने 7000 किलोंची मिसळ बनवण्याचा हा विक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेली पुणेरी मिसळ 30,000 गरजू लोकांमध्ये वाटण्यात येणार आहे. त्यासाठी 300 एनजीओंची मदत घेतली जाईल.

पहा पोस्ट:

यापूर्वी सुर्यदत्ता फूड बँकच्या वतीने सर्वात मोठा पराठा, पुरण पोळी, कबाब, नॉन स्टॉप कुकिंग मॅरेथॉन (53 तास), 5000 किलो खिडची तयार करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मिसळीला मोलाचं स्थान आहे. राज्यात विविध ठिकाणी झणझणीत मिसळ मिळते आणि प्रत्येक ठिकाणच्या मिसळीचे खासियतही वेगळीच आहे. पुणेरी, कोल्हापूरी, वऱ्डारी, नाशिकची अशा अनेक ठिकाणीची मिसळ तोंडाला पाणी आणते. दरम्यान, मराठमोळ्या मिसळीचा देशभराच नाही तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे.