Veggie Valley: घरच्या जेवणासोबतच लोक ऑनलाइन फूडही मोठ्या प्रमाणावर ऑर्डर करतात, ज्यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थांचा समावेश असतो. आता स्विगीने (Swiggy) देशभरातील लोकांच्या शाकाहारी खाद्यपदार्थांच्या पसंतीची स्थिती जाणून घेण्यासाठी एक नवीन अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, बेंगळुरूने (Bengaluru) भारतातील सर्वात शाकाहारी शहराचा किताब पटकावला आहे. स्विगीच्या ताज्या आकडेवारीनुसार, बेंगळुरूने देशभरात सर्वाधिक प्रमाणात शाकाहारी जेवण ऑर्डर केले आहे, ज्यामुळे त्याला ‘व्हेजी व्हॅली’ असे शीर्षक मिळाले आहे.
स्विगीने सांगितले की, बेंगळुरूच्या लोकांनी शाकाहारी जेवण ऑर्डर करण्यात पुढाकार घेतला आहे. अहवालात असेही समोर आले आहे की, शहरातील एक तृतीयांश शाकाहारी ऑर्डर बेंगळुरूमधून आल्या आहेत. स्विगीच्या ग्रीन डॉट अवॉर्ड्स दरम्यान ही आकडेवारी समोर आली, ज्यात बंगळुरूमधील शाकाहारी पदार्थांची सेवा देणाऱ्या शीर्ष रेस्टॉरंट्सवर प्रकाश टाकण्यात आला.
अहवालात असेही म्हटले आहे की, देशातील सर्वाधिक ऑर्डर केलेले सहा पदार्थ शाकाहारी आहेत. यामध्ये मसाला डोसा, पनीर बटर मसाला, मार्गेरिटा पिझ्झा आणि पावभाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. बेंगळुरूमधील लोकांना मसाला डोसा, पनीर बिर्याणी आणि पनीर बटर मसाला विशेष आवडतो. लोकांनी स्विगी वरून हे पदार्थ सर्वात जास्त ऑर्डर केले आहेत. (हेही वाचा: India's Butter Garlic Naan: भारतातील 'बटर गार्लिक नान'चे नाव जगातील 100 सर्वोत्कृष्ट पदार्थांच्या यादीत सामील)
स्विगीच्या विश्लेषणातून असेही दिसून आले आहे की, लोक विशेषतः नाश्त्यासाठी शाकाहारी अन्नाला प्राधान्य देतात. अहवालानुसार, 90% पेक्षा जास्त नाश्त्याच्या ऑर्डर शाकाहारी आहेत. मसाला डोसा, वडा, इडली आणि पोंगल यांसारखे शाकाहारी नाश्ता सकाळच्या चार्टमध्ये शीर्षस्थानी आहेत. याशिवाय मार्गेरिटा पिझ्झा, समोसा आणि पावभाजी हे देखील लोकप्रिय स्नॅक्स म्हणून उदयास आले आहेत. स्विगीने असेही म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर शाकाहारी ऑर्डरमध्येही वाढ होत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, शाकाहारी जेवणाचा कल भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही वाढत आहे.