Nowruz 2019: जगातील सर्वाधिक पारसी धर्मीय समाज भारत देशामध्ये राहतो. अतिशय शांत समाज म्हणून ओळख असलेले पारशी लोक अल्पसंख्यांक असले तरीही त्यांचे भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. भारताच्या साहित्य, सिनेसृष्टी, राजकारण ते उद्योग जगतामध्ये अनेकांचे नाव अभिमानाने घेतले जाते. यंदा 17 ऑगस्ट दिवशी पारशी धर्मीय नवं वर्ष (Parsi New Year) साजरं करणार आहेत. पारशी धर्मियांच्या नववर्षाच्या पहिल्या दिवसाला नवरोझ (Navroze) म्हणतात. मुंबईतही प्रामुख्याने दक्षिण मुंबईमध्ये पारसी धर्मियांची वस्ती आहे. विवाहापासून अंत्यविधीपर्यंत या समाजाच्या खास पद्धती आहेत. पारसी समाजाची खाद्यसंस्कृती देखील खास आहे. आजही मुंबईत पारशी धर्मियांची हॉटेल्स 'इराण्याचं हॉटेल' म्हणून खास ओळख बनवून उभी आहेत. मग तुम्हांलाही खास पारशी खाद्यसंस्कृतीची चव चाखायची आहे तर मुंबईत या लोकप्रिय इराण्याच्या हॉटेल्सला नक्की भेट द्या.
मुंबईत लोकप्रिय इराण्याची हॉटेल्स
-
ब्रिटानिया (Britannia & Co)
ब्रिटानिया हे मुंबईतील जुन्या पारसी / इराणी हॉटेलपैकी एक आहे. फोर्ट येथील बलार्ड पिअर भागात ब्रिटानिया हे इराणी हॉटेल आहे. पारंपारिक पद्धतीने केलेली हॉटेलची रचना, आसनव्यवस्थेसोबतच येथील पदार्थांची चव तुम्हांला अस्सल पारसी खाद्यसंस्कृतीची मुंबईतच चव राखता येईल. मटण धनसक, चिकन बेरी पुलाव, साली बोती (Sali boti)हा मटनाचा प्रकार देखील चविष्ट आहे. ब्रिटानिया मधील पदार्थांचे दर थोडे चढे असले तरीही ग्राहकांची येथे पदार्थांची चव चाखण्यासाठी गर्दी असते.
-
मेरवान्स
मेरवान्स येथील केक्स आणि बेकरी प्रोडक्स यांची चव आणि पदार्थ बनवण्याची पद्धत यामुळे खवय्यांची 'मेरवान्स' मध्ये गर्दी आहे. पेपरिका चीझ खारी (Paprika cheese khari)सोबतच लुसलुसीत केक्स प्रसिद्ध आहेत. दादर येथील रानडे रोडवर मेरवान्स चं शॉप आहे सोबतच मुंबईत त्यांची अनेक आउटलेट्स प्रसिद्ध आहेत.
-
कॅफे इराणी चाय (Café Irani Chaii)
कॅफे इराणी चाय हा माहिम येथील हॉटेलदेखील प्रसिद्ध आहे. इराणी हॉटेल म्हटलं की बन मस्का आणि चहा हे समीकरण अतुट आहे. कॅफे इराणी चाय मध्ये हा प्रकार तुम्हांला हमखास खायला मिळेल पण त्यासोबतच मटण खिम्याचेही विविध पदार्थ चाखायला मिळतील.
-
के रूस्तम आईस्क्रिम पार्लर
चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या के रूस्तम या आईस्क्रिम पार्लरमध्ये तुम्हांला आईस्क्रिम सॅन्डव्हिच हा पदार्थ चाखायला मिळेल. दोन क्रंची वेफर बिस्कीटमध्ये आईस्क्रिम भरून हे हटके सॅन्डव्हिच बनवले जाते.आईस्क्रिम बिस्किट्स हे 1953 पासून मुंबईमध्ये अस्तित्त्वात आहे.
-
गुलशन ई इराण (Gulshan – E – Iran)
गुलशन ई इराण हे अस्सल इराणी पदार्थांची चव चाखण्यासाठी मुंबईतील लोकप्रिय हॉटेल्सपैकी एक आहे. पारसी मासे आणि मांसाहाराच्या अनेक इराणी स्टाईलमधील पदार्थांची येथे चव चाखता येते. येथे पारंपारिक पद्धतीने माशांच्या पदार्थांची चव चाखता येते. तसेच हे हॉटेल बजेट फ्रेंडली आहे.
पतेती हा पारसी धर्मियांचा वर्षातील शेवटचा दिवस असतो. तर नवरोझ हा नववर्षातील पहिला दिवस असतो. या दिवशी पारसी धर्मीय अग्यारीमध्ये प्रार्थना केली जाते. तसेच पारंपारिक गोड पदार्थांची या दिवशी रेलचेल असते.