शिल्पा शेट्टी - (PC - Instagram)

Gudi Padwa 2020 Puran Poli Recipe: महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढी पाडवा (Gudi Padwa 2020) कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी घरे स्वच्छ करून सजवली जातात. तसेच घरासमोर गुढी उभारली जाते. या गुढीला पुरण पोळीचा (Puran Poli) नैवैद्य दाखवला जातो. गुढी पाडव्या अगोदर येणाऱ्या होळीच्या सणालादेखील पुरण पोळीच्या नैवैद्याचं विशेष महत्त्व असतं.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पुरण पोळीची रेसिपी सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने हेल्दी गव्हाची पुरण पोळी बनवली आहे. ही पोस्ट शेअर करताना शिल्पा शेट्टीने गुढी पाडव्या विषयी काही माहिती सांगितली आहे. यंदा गुढी पाडव्याला हा व्हिडिओ पाहून खास पुरण पोळी नक्की बनवा, असंही शिल्पाने म्हटलं आहे. (हेही वाचा - Holi Special Puran Poli Recipes: होळी निमित्त खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळीच्या 'या' लज्जतदार रेसिपीज घरी नक्की ट्राय करा, Watch Videos)

शिल्पाने पुरण पोळी बनवताना आपल्या चाहत्यांना या रेसिपीसाठी लागणारी कृतीही सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना पुरण पोळी बनवता येत नाही. त्यांच्यासाठी शिल्पाचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ पोहून अगदी सोप्या पद्धतीने पुरण पोळी बनवता येऊ शकते.

यासाठी तुम्हाला हरभरा डाळ, गुळ, बडीसोप, जायफळ, तुप या गोष्टींची आवश्यकता लागेल. सुरुवातीला दोन वाट्या हरभरा डाळ शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका. डाळ कोरडी करून त्यात गुळ मिक्स करा. त्यानंतर कढईमध्ये तुप घालून हे मिश्रण गुलाबी रंग येऊपर्यंत भाजवून घ्या. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्समधून किंवा पुरणाच्या चाळणीतून बारीक करून घ्या. त्यानंतर यात बडीसोप, जायफळाची पुड घाला. अशा प्रकारे पुरण तयार होईल.

आता पोळीमध्ये घालण्यासाठी तुमचं स्टफिंग म्हणजेच पुरण तयार आहे. तुम्ही पोळीच्या ज्याप्रकारे गव्हाचं पिठ मळून घेता. त्याचंप्रमाणे पिठ मळून घ्या. या पिठाचा छोटा गोळा करून त्यात पुरण घाला आणि गोल आकारात लाटून घ्या. पोळी लाटून झाल्यानंतर तव्यावर शेकून घ्या. या पोळीला तुम्ही तेल किंवा तुप लावू शकता. अशा प्रकारे तुमची पुरण पोळी तयार होईल. शिल्पाने अगदी सोप्या पद्धतीने पुरण पोळीची रेसिपी सांगितली आहे. या गुढी पाडव्याला महाराष्ट्राची पारंपारिक डिश म्हणजेच पुरण पोळी शिल्पाने सांगितलेल्या अंदाजात नक्की ट्राय करा.