Vada Pav | (Photo Credits: Archived, edited)

Best Food City In The World: भारतीय खाद्यपदार्थ जगभरात त्यांच्या चवीसाठी ओळखले जातात. देशातील प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला किमान एक तरी असा अनोखा पदार्थ नक्कीच आढळेल. भारतामधील अनेक शहरे तिथल्या विविध पदार्थांसाठी ओळखली जातात. आता जगप्रसिद्ध ट्रॅव्हल आणि फूड गाईड टेस्ट ॲटलसने (Taste Atlas) जगातील 100 शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे जी, त्यांच्या स्थानिक पाककृतीसाठी प्रसिद्ध आहेत. गुगलचे रेस्टॉरंट रेटिंग आणि इतर डेटा एकत्र करून हे रँकिंग तयार करण्यात आले आहे. या 2024-25 च्या जगातील 100 सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या टेस्ट ॲटलसच्या प्रतिष्ठित यादीमध्ये भारतीय खाद्यपदार्थ पुन्हा एकदा जागतिक स्तरावर ओळखले गेले आहेत. महत्वाचे म्हणजे य यादीमध्ये मुंबई 5 व्या स्थानावर आहे.

पहिली 10 शहरे- 

मुंबईच्या आधी असलेली 4 शहरे इटलीमध्ये आहेत, ज्यामध्ये नेपल्स, मिलान, बोलोग्ना आणि फ्लॉरेन्स यांचा समावेश आहे. मुंबईच्या पाठोपाठ रोम, पॅरिस, व्हिएन्ना, ट्यूरिन आणि ओसाका पहिल्या 10 मध्ये आहेत. एकूण यादीचा संदर्भ देताना, टेस्ट ॲटलसने सांगितले की, ‘आमच्या डेटाबेसमधील 17,073 शहरांमधून, 15,478 खाद्यपदार्थांसाठी 477,287 वैध फूड रेटिंगवर आधारित, ही शहरे प्रादेशिक आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी सर्वोच्च सरासरी रेटिंगसह अग्रगण्य ठरली आहेत.’ (हेही वाचा: Vikas Khanna यांच्या न्यूयॉर्क मधील रेस्टॉरंट ला प्रतिष्ठेचा Michelin 2024 Bib Gourmand Award जाहीर)

Best Food City In The World: 

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

मुंबईमधील 'हे' पदार्थ ठरले सर्वोत्कृष्ट-

आपल्या वेबसाईटवर, टेस्ट ॲटलसने मुंबईतील भेळ पुरी, पावभाजी, वडा पाव आणि रगडा पॅटीस यासह काही खास करून खावेच अशा पदार्थांची नोंद केली आहे. त्यात शहरातील काही प्रतिष्ठित पारंपारिक रेस्टॉरंट्सचा उल्लेख केला आहे जसे की, राम आश्रय, श्री ठाकर भोजनालय, कॅफे मद्रास, इ. इतर भारतीय शहरांनी देखील जगातील 100 सर्वोत्कृष्ट फूड सिटीजच्या टेस्ट ऍटलस यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये अमृतसर 43 व्या, नवी दिल्ली 45 व्या आणि हैद्राबाद 50 व्या क्रमांकावर आहे. कोलकाता 71 व्या स्थानावर आहे तर चेन्नई 75 व्या स्थानावर आहे.

शिवाय, टेस्ट ॲटलसने भारतातील विशिष्ट प्रदेशांना जगभरातील काही ‘सर्वोत्कृष्ट खाद्य क्षेत्र’ म्हणून ओळखले आहे. पंजाबचा जागतिक क्रमवारीत सातवा क्रमांक होता. मार्गदर्शकाने अमृतसरी कुलचा, टिक्का, शाही पनीर, तंदूरी मुर्ग आणि साग पनीर यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांची शिफारस केली आहे. जगातील 100 सर्वोत्कृष्ट पदार्थांच्या टेस्ट ॲटलसच्या यादीत अनेक भारतीय पदार्थांना स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये मुरघ माखानी 29 व्या क्रमांकावर, हैदराबादी बिर्याणी 31 व्या क्रमांकावर, चिकन 65 97 व्या क्रमांकावर आणि कीमा 100 व्या क्रमांकावर आहे.