Mid-Sha'ban 2019: शब-ए-बारात (Shab e Barat) ही शबान महिन्यातील (Mid-Sha'ban) मुस्लिम समाजासाठीची महत्त्वाची रात्र असते. या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चूकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यातील सुख, शांती, यश, समृद्धी यासाठी प्रार्थना करतात. 'शब' म्हणजे रात्र आणि 'बरात' एक अरबी नाव आहे ज्याचा अर्थ निरपराधीपणा असा होतो. शाबान महिन्याच्या (Shaban Month) 14 तारखेच्या सूर्यास्तानंतर ‘शब-ए-बारात’ च्या रात्रीला सुरूवात होते. यंदा इस्लामिक कॅलेंडरनुसार शब ए बारात ची रात्र 20 एप्रिल 2019 च्या रात्रीपासून 21 एप्रिलच्या सूर्यास्तापर्यंत साजरी केली जाते. Shab e Barat 2019 Special Trains on WR: चर्चगेट-विरार मार्गावर 20 एप्रिलच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे चालवणार 2 विशेष लोकल्स
शब-ए-बारात च्या रात्रीचं महत्त्व काय?
शब-ए-मेराज, शब-ए-बारात आणि शब-ए-कद्र अशा तीन रात्री मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे शब-ए-बारात. शिय्या आणि सुन्नी अशा दोन्ही पंथातील बांधव ही ‘शब-ए-बारात’ ची रात्र साजरी करतात. सुन्नी मुसलमानांच्या मते या रात्री अल्लाहने प्रेषित नोह आणि त्याचे जहाज पूरापासुन वाचवले तर शिय्या मुसलमानांच्या मते या दिवशी 12 वे शिय्या इमाम मोहम्मद अल महंदी यांचा जन्म झाला. परंतू कुराणात या रात्रीच्या महत्त्वाचा कोणताही थेट उल्लेख नाही. मृत पावलेल्यांसाठी शब ए बारातची रात्र ही ‘ईद’ प्रमाणे असते.
कशी साजरी केली जाते शब-ए-बारातची रात्र?
शब-ए-बारातच्या संपूर्ण रात्री जागून अल्लाह कडे प्रार्थना केली जाते. कुराणाचे पठण केले जाते. तसेच कब्रस्तानला भेट देऊन पूर्वजांच्या स्मृतिस्थळावर फूल वाहून आदरांजली व्यक्त केली जाते. अल्लाहची प्रार्थना करताना मृत्यूनंतर ‘जन्नत’ प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना केलीजाते. चूकांची कबुली देऊन त्यातून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते.
जगभरामध्ये शब-ए-बारात साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काही ठिकाणी फटाके तर काही ठिकाणी गोद- धोडाचे पदार्थ वाटून हा दिवस साजरा केला जातो.