Mumbai Ganeshotsav 2019 (Photo Credits: Facebook)

Mumbai Ganeshotsav 2019: भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची (ISRO)  महत्वाकांक्षी चांद्रयान 2 (Chandryaan 2)  मोहीम येत्या 7  सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे. तत्पूर्वी देशभरात 2  सप्टेंबर पासून गणेशोत्सव सोहळ्याला देखील सुरवात होईल. भारतीयांसाठी महत्वाच्या या दोन गोष्टींची सांगड घालत यंदा गणेशोत्सव मंडळांनी चांद्रयान मोहिमेवर आधारित सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने मुंबईतील मानाच्या अशा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आणि परेलचा (नरे पार्कचा) राजा (Parelcha Raja) मंडळाने गणपतीचा मंडपाला चक्क अंतराळाचे रूप द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे यंदा बाप्पाच्या भक्तांना त्यांचे लाडके गणराज ग्रह ताऱ्यांनी सजलेल्या अंतराळाच्या वातावरणात, मिसाईल- रॉकेटच्या मधोमध विराजमान झालेले पाहायला मिळतील.

लालबागचा राजा मंडळाचे नेपथ्यकार व कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या संदर्भात टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे वर्षभरात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडपाची सजावट करण्याचा त्यांचा मनसुबा होता. यानुसार चांद्रयान मोहीम लाँच होण्याच्या आधीच त्यांनी अंतराळ सजावट करण्याचे ठरवले होते. वास्तविक, लालबाग मधील मार्केट मधल्या छोट्याश्या जागेत राजा साठी हा देखावा उभारणे हे मोठे टास्क असले तरीही या जागेत यशस्वी रित्या अंतराळयान, हलणारे अंतराळवीर बसवून सजावट पूर्ण करण्यात आल्याचे देखील देसाई यांनी सांगितले आहे. येत्या 7 सप्टेंबरला चंद्रावर चांद्रयान पोहचण्याचा आधीच बाप्पा स्वागताला उपस्थित असतील असेही त्यांनी मजेत म्हंटले.

दुसरीकडे, नरे पार्क येथील परेलचा राजा मंडळाने सुद्धा चांद्रयान 2 मोहीमेची थीम मंडपाच्या सजावटीत अवलंबली आहे. यानिमित्ताने यंदाचा नरे पार्कचा 26 फूट उंच बाप्पा चंद्रावर नाचताना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2019 Muhurat : गणेशाची पूजा कशी केली जाते, याची माहिती आहे का? मग जाणून घ्या गणेशोत्सवातील पूजा, महूर्त आणि महत्व)

दरम्यान, मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाने राम मंदिराची हटके थीम निवडून राजाची मूर्ती रामाच्या रूपात बनवण्यात आल्याचे सांगितले. तर पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या इको फ्रेंडली स्टाईलचा वापर करून तेजुकाया मंडळाच्या राजाची 22 फूट उंच मूर्ती ही कापूस आणि कागद वापसून बनवण्यतात येणार असल्याचे देखील समजत आहे. येत्या २ सप्टेंबर पासून अनंत चतुर्थी पर्यंत दरवर्षी प्रमाणे यंदा देखील लालबाग- परळ परिसरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळेल, हा अनुभव घेण्यासाठी या मंडळांना आवर्जून भेट द्या.