
Maharashtra Travel News: दस्तुरी प्रवेशद्वारावरील दलाल आणि घोडेस्वारी घडवणारे घोडेमालक पर्यटकांची दिशाभूल करत आहेत आणि जास्त पैसे घेत आहेत, ज्यामुळे पर्यटकांची फसवणूक तर होतच आहे. पण, पर्यटकांना अनाठाई आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. स्थानिकांनी दलाल आणि घोडेस्वारांबद्दल अनेक तक्रारी करुनही प्रशासनातील अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. परिणामी पर्यटकांची फसवणूक होते आणि माथेरानची प्रतिमा खराब होते, असा आरोप करत स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. दलाल आणि घोडेस्वार यांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी बंद (Matheran Strike) पुकारला आहे. या बंद मुळे माथेरान अनिश्चित काळासाठी बंद झाले आहे. स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी या भागातील सर्व पर्यटन उपक्रम पूर्णपणे बंद करण्याचा सामूहिक निर्णय घेतला.
माथेरान का बंद आहे? आंदोलनातील प्रमुख मुद्दे
- प्रवेशद्वारावरील फसवेगिरी: स्थानिक आंदोलकांचा असा दावा आहे की, काही घोडेस्वार आणि दलालांनी माथेरान पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांची फसवणूक केली आहे आणि त्यांच्याकडून जास्त दर आकारले आहेत.
- अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव: रहिवाशांनी यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी माथेरान महसूल विभाग, नगरपरिषद, वन विभाग आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
- पूर्ण बंदची मागणी: या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकारी कठोर उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत माथेरान बंद राहील असे एमपीव्हीएसएसने जाहीर केले आहे.
- स्थानिक क्षेत्रांचा पाठिंबा: आतिथ्य उद्योग, ई-रिक्षा संघटना, सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे. (हेही वाचा, Matheran Tourism: घोडेस्वारांकडून जास्त भाडे आकार, स्थानिकांनी अनिश्चित काळासाठी बंदची हाक, माथेरान पर्यटनाला फटका)
माथेरानमध्ये अंधार पडल्याने पर्यटकांना त्रास
दरम्यान, 18 मार्च रोजी माथेरानला येणारे पर्यटक गोंधळले कारण त्यांना सर्व दुकाने, हॉटेल्स आणि वाहतूक सेवा बंद असल्याचे आढळले. 'आम्हाला या संपाची कल्पना नव्हती. सर्व काही बंद होते आणि आम्हाला घरी परतावे लागले. उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे, माथेरान हे मुंबईकरांसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, परंतु या संपाचा पर्यटनावर मोठा परिणाम होईल,' असे घाटकोपर येथील पर्यटक नितीन पगार म्हणाले, असे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
माजी नगरपरिषद अध्यक्ष आणि एमपीव्हीएसएस सदस्य मनोज खेडकर यांनी सांगितले आहे की पर्यटकांविरुद्धच्या फसव्या कारवाया पूर्णपणे बंद होईपर्यंत हा संप अनिश्चित काळासाठी सुरू राहील. दरम्यान, सोशल मीडियावरील नकारात्मक संदेशांमुळे माथेरानच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की घोडे नेहमीच शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिले आहेत आणि त्यांना अन्याय्यपणे लक्ष्य केले जाऊ नये, असे म्हणत घोडे मालकांनी त्यांच्या भूमिकेचा बचाव केला आहे.
पर्यटन हंगाम जवळ येत असताना, माथेरानच्या अनिश्चित काळासाठी बंदचा स्थानिक व्यवसाय आणि पर्यटक दोघांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. निदर्शकांच्या मागण्यांना अधिकारी कसे प्रतिसाद देतात आणि पर्यटन उपक्रम लवकरच पुन्हा सुरू होतील का याबाबत उत्सुकता आहे.