Konkan Ganeshotsav 2020: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी ई-पास आवश्यक नाही, क्वारंटाइन कालावधी केवळ 10 दिवसांवर
Konkan Ganeshotsav 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव (Konkan Ganeshotsav 2020) साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना आता ई-पास काढण्याची आवश्यकता नाही. तसेच, या नागरिकांनी कोकणात गेल्यावर 14 दिवसांचा क्वारंटाईन (Quarantine) कालावधीही पूर्ण करण्याची गरज नाही. दोन्हीमंध्ये सवलत देण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे नागरिक गणेशोत्सवासाठी परिवहन बसने म्हणजेच एसटीने कोकणात जातील त्यांच्यासाठी ई-पासची गरज नाही. मात्र जे नागरिक खासगी वाहनाने कोकणात प्रवेश करतील त्यांना मात्र ई-पास (E Pass) काढणे आवश्यक आहे. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी क्वारंटाइन कालावधीही 14 दिवसांहून 10 दिवसांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच या नागरिकांना आता केवळ 10 दिवसच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी कोकणात 12 ऑगस्टपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. हे नागरिक कोकणात पोहोचले की त्यांनी तिथे 10 दिवस क्वारंटाइन असणे आवश्यक आहे. जे नागरिक बसने कोकणात जातील त्यांना ई-पासची गरज नाही. जे नागरिक खासगी वाहनाने जातील त्यांना मात्र ई-पासकाढावा लागणार आहे.

पुढे बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, कोकणात जाण्यासाठी नागरिक 22 जणांचा समूह करुनही सामूह नोंदणी करु शकतात. 22 जणांचा समूह असेल आणि हे लोक कुठेही थांबणार नसतील तर त्यांना बसने थेट गावातही सोडण्यात येईल. बससाठी आज (4 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजलेपासून बुकींगला सुरुवात होणार आहे. नागरिकांना हव्या तितक्या बस सोडल्या जातील. मात्र नागरिकांनी गर्दी करु नये असेही परब यावेळी म्हणाले. (हेही वाचा, Ganpati Utsav 2020: कोरोना काळात नियम पाळून एसटीने कोकणात जाता येणार- अॅड. अनिल परब)

दरम्यान, खासगी वाहन सेवा देणाऱ्यांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी किती भाडे आकारावे याचेही काही नियम आहेत. जे नागरिक बसने कोकणात जातील त्यांच्यासाठी ई-पासची सक्ती नाही. मात्र, जे लोक खासगी वाहनाने कोकणात जातील त्यांनी ई-पास काढणे बंधनकार आहे. शिवाय खासगी वाहन सेवा देणाऱ्यांनी या प्रवाशांकडून बस भाड्याच्या केवळ दीड टक्के अधिक रक्कम प्रवासी भाडे म्हणून घ्यावी, असेही परब या वेळी म्हणाले.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी 12 ऑगस्ट पूर्वी कोकणात पोहोचावे. मात्र, जर कोणी 12 ऑगस्ट नंतर कोकणात दाखल झाले तर मात्र त्यांना 48 तासांच्या आत कोरोना व्हायरस चाचणी करणे बंधनकारक असल्याचेही परब यांनी या वेळी सांगितले.