Kamala Ekadashi 2020: हिंदू धर्मामध्ये तसेच वारकरी संप्रादयामध्ये एकादशी तिथी विशेष मानली जाते. मात्र, अधिक मासातील एकादशीचे महत्त्व अधिक मानले गेले आहे. अधिक मासातील दोन्ही पक्षातील एकादशीला कमला एकादशी (Kamala Ekadashi) म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाते. रविवारी म्हणजेच 27 सप्टेंबरला कमला एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या एकादशीलाचं पुरुषोत्तम एकादशी असेही म्हटले जाते. अधिक महिना हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. आज या खास लेखातून आपण कमला एकादशीच्या दिवशी करायचे व्रत आणि पूजाविधी जाणून घेऊयात.
कमला एकादशी व्रत आणि पूजा विधी -
- एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदी किंवा तलावावर जाऊन शेण, माती, तीळ, कुश आणि आवळ्याच्या चूर्णाने स्नान करावे.
- त्यानंतर मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाची धूप-दीप, नैवेद्य, फुल, केशर अर्पण करून पूजा करावी.
या दिवशी पाणी न पिता व्रत ठेवावे. परंतु, तुम्हाला शक्य नसल्यास केवळ पाणी पिऊन किंवा फळ खाऊन हे व्रत करावे.
- या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक 3 तासांनी भगवान विष्णू-लक्ष्मी आणि महादेव-पार्वतीची पूजा करावी.
- याशिवाय या दिवशी देवाला नारळ, बेलाचे फळ, सीताफळ आणि सुपारी अर्पण करावी. शक्य असल्यास रात्रभर जप करावा.
दरम्यान, द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर ब्राह्मणांना जेवण आणि दक्षिणा द्यावी. कमला एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वादाचा लाभ मिळतो, असं म्हटलं जातं. पुरुषोत्तम एकादशीचे व्रत करणाऱ्यांना हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, असं पौराणिक कथेत म्हटलं आहे. याशिवाय हे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते.