आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे राज्य भरातून विविध पालख्यांचे मोठ्या उत्साहात प्रस्थान होते. मुक्ताईनगरमधील संत मुक्ताई संस्थांच्या मुक्ताईंच्या पालखीचा पहिला मान असतो. जळगाव जिल्ह्यातील ही मानाची पालखीचं आज पंढरपूरात दाखल झाली आहे. मुक्ताईनगरमधून मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने पालखीचे प्रस्थान होते आणि पंढरीत दाखल होणारी पालखी म्हणून मुक्ताईच्या पालखीचं विशेष महत्व आहे. गेल्या 34 दिवसात जवळपास 750 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी, संत मुक्ताबाई महिला संत असल्याने या पालखी सोहळ्यात 1500 महिला आणि 1000 पुरुष भाविक सामील झाले आहेत.
खानदेश ,मराठवाडा, विदर्भ , आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झालेले आहेत. पालखी मार्गात मोठं अंतर पार करत विठुरायाच्या ओढीने हे भाविकांनी आज पंढरपूर गाढलं आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाचं स्थान आहे. राज्यभरातून पंढरपूर कडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघते तशी ती पंढरपूर येथे ही पहिल्यांदा पोहचते. या आगमन प्रसंगी या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. पंढरीत दाखल झाल्यानंतर मुक्ताबाई यांच्या पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून ही पालखी दत्त घाटावरील मुक्ताबाई मठात विसावली आहे. (हे ही वाचा:-Mumbai: 'यंदा मुंबईमध्ये कृत्रिम तलावांमध्येच होणार PoP गणेश मूर्तींचे विसर्जन'- BMC)
कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला होता.